लांजा:-अघोरी पद्धतीने १२ वर्षीय बालकावर मसाज करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील भांबेड तेलीवाडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल सात महिन्यांनी शुक्रवारी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भांबेड तेलीवाडी येथील रहिवासी नारायण येसू शेलार (६२) यांच्याकडे मसाज अगर कोणत्याही प्रकारचा उपचार करण्याचा परवाना नाही. ही व्यक्ती मसाजद्वारे उपचार करते याची माहिती घेऊन कल्याण घाडगे हे आपल्या १२ वर्षाचा मुलगा यश कल्याण घाडगे (राहणार आंबवडे वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) याला घेऊन आले होते. यश हा लहानपणापासूनच अपंग होता.
मात्र यश घाडगे या लहानपणापासून अपंग असलेल्या मुलाचा मसाज केल्याने जीव जाऊ शकतो याची जाणीव असताना देखील नारायण शेलार यांनी दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० सुमारास यश घाडगे याच्या पाठीपासून दोन्ही पायापर्यंत तेल, बाम आणि इतर औषधे लावून पायावर आणि पाठीच्या मणक्यावर वजनदार दगडी जाते फिरवून त्याला उभा करून त्याचे दोन्ही पाय आणि मान ओढून ताणून असह्य वेदना होत असताना देखील मसाज केला. यामध्ये यश याचा श्वास आणि हालचाल बंद झाल्याने त्याला प्रथम उपचार करता प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड आणि तेथून अधिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी दुपारी २.३० वाजता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले होते.
अशाप्रकारे अघोरी पद्धतीने यश कल्याण घाडगे या बालकाचा मसाज करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी नारायण शेलार यांच्यावर भा.दं.वि.कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.