लांजा:-शहरातील सातत्याने खंडित होण्याऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर आमदार राजन साळवी यांच्या सूचनेनुसार आज महावितरणचे कार्यकारी उपअभियंता आणि शिवसेना शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ११ केव्हीची विद्युत वाहिनी आणि २० खांब यांचे सर्वेक्षण करण्यात आले.लांजा शहराला पुनस फिडरमधून विद्युतपुरवठा होतो. तो फीडर जंगलात असल्यामुळे सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे लांजा शहरासाठी आयटीआय ते शहनाई हॉल या नवीन विद्युतवाहिनीसंदर्भात सर्वेक्षण करून लवकरात लवकर कार्यवाही करून ती कार्यान्वित व्हावी आणि लांजा शहरवासीयांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार श्री. साळवी यांनी प्रयत्न केले.लांजा शहर आणि तालुका वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावर आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन लांजा महावितरण कार्यालयावर धडकले होते. श्री. साळवी यांनी उपअभियंत्यांना लांजा शहर फिडर आणि ११ केव्ही नवीन वाहिनीचे काम तातडीने हाती घेण्यास सुचवले होते. त्यानुसार आज लांजा महावितरण उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर, लाइनमन प्रवीण शिवगण, प्रथमेश साळवी, लांजा शहर प्रमुख नागेश कुरूप, नगरसेवक राजू हळदणकर, आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक मयूरेश भट, अनंत इलेक्ट्रिकचे महेश नागले यांनी आयटीआय ते शहनाई हॉल यामध्ये विद्युतवाहिनीकरिता सर्वेक्षण केले. नव्या २० खांबांची आवश्यकता असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.लवकरात लवकर ही वाहिनी टाकण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे.