लांजा:-लांजा नगर पंचायतीच्या पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर पंचायत सेवा अधिनियमानुसार वेतन आणि फरक मिळावा, यासाठी राज्य नगर परिषद आणि नगर पंचायत कर्मचारी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
समितीने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण आणि ६ ऑगस्टला प्रत्येक नगर पंचायत आणि नगर परिषद कर्मचारी ‘काम बंद’ आंदोलन करणार आहेत.राज्यात नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतीमध्ये पूर्वाश्रमीचे कर्मचारी ग्रामपंचायत सेवेमध्ये कायम होते. गेल्या सात वर्षांपासून हे सर्व कर्मचारी लाभांपासून वंचित आहेत. त्यातील काहीजण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु त्या कर्मचाऱ्यांनाही नगर पंचायत सेवा लाभ मिळाले नाही.
ग्रामपंचायत सेवा या कर्मचाऱ्यांना धरून लाभ देण्यात यावा, अशी मागणी आहे.नगर पंचायतीमध्ये सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, या कर्मचाऱ्यांना सेवा लाभ मिळावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, नगर परिषद नगर पंचायत कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्यात यावे, रद्द झालेला जकात कर पुन्हा सुरू करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.