नवी दिल्ली:-देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आयुष्याची 70 वर्षे ओलांडलेल्या सर्व वृद्धांवर आयुष्मान योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठराव्या लोकसभेला संबोधित करताना ही माहिती दिली.विशेष म्हणजे भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात याबाबत आश्वासन दिले होते.
राष्ट्रपती मुर्मू यांनी काल, गुरुवारी संसदेला संबोधीत करताना सांगितले की, नवीन सरकारमध्ये आम्ही 70 वर्षांवरील सर्व व्यक्तींना आयुष्मानचा लाभ देत आहोत. एवढेच नाही तर सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. सुमारे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडे वर्ग करण्यात आले. यातून आम्ही शेतकऱ्यांना अधिक स्वावलंबी बनवले आहे. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘माय इंडिया’चाही उल्लेख केला. राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी सरकारने ‘माय यंग इंडिया-माय इंडिया’ मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक तरुणांनी यात नोंदणी केली आहे. तसेच सरकार डिजिटल युनिव्हर्सिटी बनवण्याच्या दिशेनेही काम करत असल्याचे राष्ट्रपीत मुर्मू यांनी सांगितले.