रत्नागिरी:-येथील बांधकाम व्यावसायिक दिनेश जैन यांना शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडून अज्ञात व्यक्तीने १७ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली.फिर्यादी सोशल मीडियावरून शेअर मार्केटसंबंधीची माहिती घेत असत. त्यातील मॅक्सिमा फायनान्स सिक्युरिटी या नावाने एक जाहिरात त्यांना दिसली. फिर्यादी यांनी शेअर मार्केटसंदर्भात त्यांचा व्हॉट्स ऍप ग्रुप जॉइन केला. या ग्रुपचे ऍडमीन असलेल्या कुणाल गुप्ता आणि जेनीस मेहरा या नावाच्या व्यक्तींनी व्हॉट्स ऍपवरूनच फिर्यादीशी संपर्क साधून त्यांना कंपनीच्या लिंकद्वारे डीमॅट अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. त्यातून विविध आयपीओ व शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात फिर्यादी यांची १७ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक झाली असून याबाबत रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.