शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुखांचा एस.टी.कार्यालयात आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी : ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. चार दिवसात विद्यार्थ्यांची पायपीट न थांबल्यास त्याच गावातील विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रुख बंड्याशेठ साळवी यांनी दिला आहे. तालुकाभरातील अनेक विद्यार्थ्यांना एसटी बसफेऱ्यांविना सुमारे दोन ते अगदी पाच-सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. बसफेऱ्या सुरू करण्याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांची तक्रार घेवून येथील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाच्या कार्यालयावर धडक मारली. प्रशासनाने चार दिवसांत बसफेऱ्या सुरू कराव्यात, अन्यथा त्या गावांतील विद्यार्थ्यांना घेऊन एसटी कार्यालयावरील आंदोलनाचा इशारा तालुकाप्रमुख बंडया साळवींनी दिला आहे.रत्नागिरी तालुक्यात अनेक बसफेऱ्या कोरोना काळापासून एसटी प्रशासनाने बंद केल्या. आजही ग्रामीण भागातील त्या बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यातील उंबरे, हरचेरी, भोके, चिंद्रवली, मिरजोळे आदी भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ येत आहे. तसेच सार्वजनिक किंवा रविवार सुट्टीच्या दिवशी देखील शहरीसह ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद ठेवल्या जातात. त्याचा या भागातील ग्रामस्थांना फटका बसत आहे. रत्नागिरी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या कोरोनानंतर कमी करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे; मात्र प्रवासी भारमान कमी असल्याचे सांगत या फेऱ्या बंद ठेवण्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. या होणाऱ्या गैरसोयीबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माळनाका येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात धडक दिली. उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे आणि तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, माजी जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर, विभागप्रमुख राकेश साळवी, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुख विजय देसाई यांच्यासह हरचेरी येथील चंद्रशेखर मांडवकर, दत्ताराम इरीम, नासीर मुकारी, उंबरे येथील विनोद उकीर्डे, सो तसेच भोके, फणसोप येथील ग्रामस्थही होते.