मंडणगड:-नवी मुंबईतील दै. ‘नवे शहर”चे उपसंपादक राजेंद्र घरत यांच्या ‘गणपती, गीते आणि गानरसिक” व ‘शिकण्याचं वय” या ब्रेल लिपीतील चोविसाव्या आणि पंचविसाव्या पुस्तकांचे प्रकाशन पंचनदी (दापोली) येथील ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, संगीतकार इक्बाल शर्फ मुकादम यांच्या हस्ते घराडी (ता.मंडणगड) येथील स्नेहज्योती अंध विद्यालयात करण्यात आले.
याचवेळी नवी मुंबई महापालिका सचिव सौ. चित्रा बाविस्कर यांच्या ‘राष्ट्रीय सण” व ‘भारतीय सण” या सतराव्या आणि अठराव्या पुस्तकांचे प्रकाशनही श्री. मुकादम यांच्या हस्ते पार पडले.राजेंद्र घरत लिखित ‘मुशाफिरी” या दै. ”आपलं नवं शहर” मधून गेली पंचवीस वर्षे प्रसिद्ध होत असलेल्या लेखमालेतील निवडक लेखांचा समावेश त्यांच्या या दोन पुस्तकांत करण्यात आला आहे. यावेळी श्री. मुकादम म्हणाले की ब्रेल लिपी, रेकॉर्डिंग यामुळे दृष्टीहीनांनाही आता शारीरिक कमजोरीवर अंशतः विजय मिळवून ज्ञान, माहिती मिळवणे सोपे झाले आहे. घराडी येथील ही अंधशाळा पंचनदी हे माझे गाव जवळ असूनही येथे येण्याची संधी याआधी आली नव्हती.श्रीकृष्ण हे माझे आवडते दैवत असून श्रीकृष्ण-राधेवरही मी गीतरचना केल्या आहेत. या सर्व लेखनाचे ब्रेल रूपांतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सेनगुप्ता यांच्या मेहनतीमुळे दृष्टीहीन मुलांसमोर जात असल्याचा आनंद यावेळी लेखक राजेंद्र घरत यांनी व्यक्त केला. माझ्या दिवंगत मातेचेही नाव ‘प्रतिभा” असल्याने सौ. सेनगुप्ता यांच्यात मी आपली आईच पाहत असून गेल्या पंधरा-सोळा वर्षांत केवळ त्यांच्यामुळेच माझी पंचवीस पुस्तके ब्रेलमध्ये येऊ शकली, याबद्दल मी कृतज्ञ आहे.सौ. चित्रा बाविस्कर म्हणाल्या, साहित्य ही मानवी जीवनाची गंगोत्री आणि मनाची मशागत करण्याचा उत्तम स्रोत असून साहित्यसेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला कृतकृत्य समजते.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी व संगीत शिक्षकांनी विविध गाणी सादर केली. सौ. प्रतिभा सेनगुप्ता, स्नेहज्योती संंस्थेच्या अध्यक्ष सौ. आशाताई कामत यांनी सर्वांचे स्वागत केले. लेखक घरत, बाविस्कर यांनी यावेळी सोबत नेलेल्या तसेच नवी मुंबईतून व अन्य ठिकाणांहुन काही हितचिंतकांनी पाठवलेल्या शालेय वापराच्या चीजवस्तू, खाऊ, छत्र्या, कपडे, धान्य यावेळी वितरित करण्यात आले.