चिपळूण: परशुराम घाटात दरवर्षी निर्माण होणारे अडथळे आणि त्यामुळे वाहतुकीचा होणारा खोळंबा पाहता पर्यायी मार्ग म्हणून चिरणी आंबडस रस्ता रुंद करून दळवटणे-खेर्डी एमआयडीसी असा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे. त्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील पत्र दिले आहे. हा पूल झाल्यास पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील असेही त्यांनी नमूद केले आहे.परशुराम घाटालाच पर्यायी मार्ग तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुकादम यांनी एक पर्याय सुचवला आहे. लोटे येथून चिरणी, आंबडस, कळंबस्ते- चिपळूण हा रस्ता अस्तित्वात आहे. परंतु तो एकेरी मार्ग असल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होते. या रस्त्याचे रुंदीकरण तसेच मजबुतीकरण करण्यात यावे, तसेच दळवटणे ते खेर्डी एमआयडीसी आहे, असा वाशिष्ठी नदीवर थेट पूल उभारल्यास हा एक पर्यायी मार्ग तयार होऊ शकतो. दळवटणे येथून थेट खेर्डी येथे कराड-चिपळूण मार्गावर वाहतूक सुरू होईल आणि मुंबई-गोवा महामार्गावर देखील लगेच जाता येईल असेही त्यांनी सुचवले आहे.