परशुराम घाट पाहणीनंतर महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांचे स्पष्टीकरण
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात शुक्रवारी सकाळी संरक्षक भिंत व भराव कोसळला, त्यामागे पाऊस हे मुख्य कारण आहे. घाट परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने तेथील पाण्याचा प्रवाहही मोठा होता. त्यामुळे हा प्रकार घडला. तरीही यासंदर्भातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पुढील उपायोजना केल्या जातील, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
शुक्रवारी परशुराम घाटात मातीच्या भरावासह संरक्षक भिंत कोसळली सर्व्हिस रोडलाही तडे गेले. घाटातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन महामार्गची एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. शुक्रवारच्या या प्रकारानंतर शनिवारी सायंकाळी महामार्गचे मुख्य अभियंता शेलार, डिझाईन सर्कलचे मुख्य अभियंता रामगडे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परशुराम घाटाची पाहणी केली. दोन तासांच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी या प्रकरणी पावसाला दोष दिला.
ते पुढे म्हणाले की, निसर्गात नवं काही काम करत असताना काही ना काही अडचणी येत असतात. आपण त्यावर मार्ग काढून पुढे जात आहोत. गेल्या २ दिवसांत या भागात झालेल्या पावसामुळे येथील २० ते ३० मीटरमध्ये संरक्षक भिंत व थोडासा भराव कोसळला आहे. आता एक मार्गिका बंद करून दुसरी सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाहतुकीला कोणतीही अडचण नाही. तसेच घाटाला धोका कोणताही नाही. रस्त्यालाही काहीही झालेले नाही तरीही काळजी घेतली जाईल २४ तास आमची टिम येथे कार्यरत राहणार आहे. कोसळलेल्या भिंतीला काय काय करायचे यासंदर्भात तज्ज्ञ आले आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. भिंतीला टप्याटप्याने चांगला सपोर्ट देणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने गरज लागली तर नव्याने भूसंपादनही केले जाईल.