रत्नागिरी:-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले नारायण राणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचे मोठे योगदान होते अशा शब्दांत माजी आमदार बाळ माने यांनी भाजपच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा महायुतीच्या माध्यमातून झालेला विजय नेत्रदीपक आणि ऐतिहासिक आहे. तब्बल ४५ वर्षे कमळ चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांची मनोकामना राणे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली.
मागील दोन निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींसाठी मतदान झाले खरे पण उमेदवार भाजपाचा नसल्याची सल मनात असल्याने कार्यकर्त्यांनी तन-मन-धन अर्पून काम केल्यानेच हा विजय प्राप्त झाला, असे प्रतिपादन श्री. माने यांनी केले.रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे भाजपा कुटुंब म्हणून अभिनंदन करणे आवश्यक होते. याकरिता जयेश मंगल पार्क येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात माने बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उपस्थित होते.सध्या कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे विजयी झाल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. या निवडणुकीत ही ताकद दिसून येईल. आगामी काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आहेत. तसेच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आहेत. यात भाजपाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत यश मिळवण्याकरिता कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, याकरिता या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्याला भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. बाबासाहेब परुळेकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. विलास पाटणे, ॲड. भाऊ शेट्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते.