गुहागर : बस चालकाच्या प्रतापाने अख्खं गाव दोन दिवस अंधारात गेल्याची घटना घडली आहे. एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत नेऊन खांब तुटून पडले. यामध्ये गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथील ग्रामस्थांना गेले दोन दिवस विजेअभावी अंधारात राहावे लागेल आहे. चालकाच्या या बेपर्वाईमुळे येथील ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले असून गुहागर आगाराला याबाबत पत्र देऊन नुकसान भरपाईची मागणी केल्याची माहिती शृंगारतळी महावितरणचे सहाय्यक अभियंता मंदार शिंदे यांनी दिली.
गुहागर आगारातून सकाळी ११ वाजता सुटणारी गुहागर-पेवे व्हाया पाटपन्हाळे ही बस विद्यार्थ्यांना शृंगारतळी शाळेत घेऊन पाटपन्हाळे कोंडवाडी जात होती. या दरम्यान, ही बस पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे यांच्या घराजवळ आली असता रस्त्यावरुन एका घराकडे गेलेली वीजेची सर्व्हिस वायर व तीला जोडून असणारी जीआयची तार बेधडक ओढत नेली. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने उभे असलेले सिमेंटचा १ व लोखंडी २ असे ३ वीजखांब तुटले. एवढा प्रकार घडूनही एसटी चालक न थांबा तो बस सुसाट घेऊन गेला. दरम्यान, यावेळी घडलेला प्रकार तेथील काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. गेले दोन दिवस कोंडवाडीतील काही घरे वीजेअभावी अंधारात होती. दिवसभर मुसळधार पाऊस असूनसुध्दा महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येथे कामगार लावून वीजखांब उभे केले व वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले आहे.