दापोली:-गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी पाजपंढरी (ता. दापोली) येथे घडली. मालती रामचंद्र चौगुले असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान पाजपंढरी गावातील रामचंद्र चौगुले व कृष्णा चौगुले या भावांच्या घराच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. यावेळी घरातील महिला अंगणात काम करत होती. अचानक मोठा आवाज झाल्याने काही महिला घरात धावल्या. मालती चौगुले या घरात पळण्याच्या तयारीत असतानाच पायावर व डोक्यावर स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.