पाली : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे सकाळी नवीन घराच्या बांधकामावर पाणी घालण्यासाठी गेलेल्या अमित जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये तरूणाच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहमीप्रमाणे आपल्या नवीन घराच्या बांधकामावर पाणी घालण्यासाठी अमित जाधव गेला होता. त्यावेळी आतमध्ये आडोशाला बसलेल्या बिबट्याने अमित जाधव याच्यावर झडप घातली. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्याने अमित घाबरून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून या तरूणाला तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पुढील अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वीच साखरपा गुरववाडीतील अंजली लिंगायत नामक महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान अमित जाधव या तरूणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडताच माजी सभापती जया माने यांनी रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी अमित जाधव याची विचारपुस केली. सलग दुसरी घटना असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. त्याचबरोबर वनअधिकारी तौफिक मुल्ला यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन जखमी अमित जाधव याची पाहणी केली. डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बिबट्याने हल्ला करण्याची ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाने त्वरीत या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.