मुंबई:-कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे.पावसाळ्यात रेल्वे मार्गांवर गस्त घालण्यासाठी ६७२ कर्मचारी तैनात करण्यात आले असुन कोकण रेल्वे मार्गावर नऊ ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल सज्ज असणार आहेत.
दरम्यान पावसाळ्यात अतिवृष्टी अथवा दृश्यमानता कमी असल्यास गाड्यांचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना रेल्वेच्या लोको पायलेट यांना देण्यात आले आहेत. अशी माहिती कोकण रेल्वे कॉपोरेशनचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर संतोषकुमार झा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहप्रबंधक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.मान्सून काळात,दरवर्षी कोकणात सर्वाधिक पाऊस कोसळतो. तेव्हा पावसात रेल्वे गाड्या सुरक्षित आणि सुरळीत सुरु राहाव्यात. त्यासाठी कोकण रेल्वेकडून दरवर्षी मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जाते. यंदाही कोकण रेल्वेने पाणलोटाची साफसफाई, रेल्वे मार्गावर भू-सुरक्षा कार्ये अशी महत्त्वाची कामे नुकताच पूर्ण केली आहेत. कोकण रेल्वे आपल्या रेल्वे सेवांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. यंदाही ३१ ऑक्टोबर पर्यंत रेल्वेचे नविन मान्सुन वेळापत्रक अवलंबण्यात आले आहे.त्याचबरोबर पायाभूत सुविधांची देखभाल, वाढीव गस्त आणि आपत्कालीन तयारी यावर लक्ष केंद्रित करून मान्सूनच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. प्रतिकूल हवामानात गाड्यांचे सुरळीत आणि सुरक्षित संचालन करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गांवर गस्त घालण्यासाठी ६७२ कर्मचारी तैनात केले आहेत. संवेदनशील ठिकाणांवर २४ तास गस्त घालण्यासह या भागात रेल्वे गाड्यांच्या वेगावर निर्बंध लादले आहेत.तांत्रिक मदतीसह वैद्यकीय सज्जतामुसळधार पाऊस पडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. मात्र, आता पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदीं ठेवून रेल्वेची वाहतुक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कोकण रेल्वेने वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, वेर्णा ,कारवार,भटकळ आणि उडुपी या ९ स्थानकावर रेल मेंटेनन्स व्हेईकल तैनात ठेवले असून तत्काळ प्रतिसादासाठी माणगाव, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी या स्थानकांवर टॉवर व्हॅगन सज्ज आहेत.रत्नागिरी आणि वारणा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय सहाय्याने सुसज्ज स्वयंचालित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन उपलब्ध आहेत. याशिवाय स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र देखील बसवल्यामुळे कोकण रेल्वेला पावसाळ्यात पावसाची अचूक नोंदी घेऊन नियोजन करण्यास मदत होणार आहे.