मंडणगड : तालुक्यात मान्सून सक्रीय झाला आहे. २० जून रोजी तालुक्यात ८६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसाला सुरुवात झाल्यापासून तालुक्यात एकूण २३१.८८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सक्रीय मान्सूनमुळे नागरीकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दि. २० रोजी केळवत घाटात रस्त्याशेजारी असलेले झाड वाऱ्याने कोसळल्याने वाहतूकीसाठी काही काळाकरिता अडथळा निर्माण झाला होता. तहसिल कार्यालयाचे आपत्तीकक्षाने तातडीने याची नोंद घेत वाहतूकीस दीर्घकाळाकरिता अडचण निर्माण होणार नाही.याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागास सुचना दिल्या व बांधकाम विभागाने तातडीने वाहतूकीस अडथळा ठरत असलेले झाड जेसीबीचे मदतीने बाजूला केले. तुळशी घाटात सकाळी सव्वासात वाजण्याचे सुमारास मंडणगडकडून निगडी या गावाकडे जात असलेल्या इको गाडीस अपघात झाला. घाटातील एका वळणात रस्त्यावरुन टायर सरकुन गाडी रस्ता सोडून खाली उतरुन पलटी झाली. या गाडीतून दोघेजण प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघात कोणलाही दुखापत झाली नाही मात्र या घटनेने रस्त्याचे अपुर्ण कामांमुळे सुरक्षित प्रावासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विजांच्या कडकडाटसह पावासाने तालुक्यात लावलेली हजेरी हे आजच्या दिवसाचे वैशिष्ठ्य ठरले.