भाजपा व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी केला पर्दाफाश
चिपळूण:- शहरातील एका बेकरीमधील अस्वच्छतेचा प्रकार भाजप व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकाराबाबत चिपळूणवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर बेकरी अस्थापनाची अन्न सुरक्षा प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.चिपळूण शहरात केक बनविणे व केक विक्रीच्या बऱ्याच बेकरी आहेत. काविळतळी परिसरातील बेकरीमधून उग्र वास येत असल्याचे भाजपा महिला पदाधिकारी राधा लवेकर व काही जागरूक महिलांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान, याची पोलखोल करण्याचा या महिलांनी निर्धार केला. यानुसार बुधवारी संध्याकाळी या भाजप व मनसे महिला पदाधिकारी व जागरूक महिला या बेकरीवर धडकल्या. यावेळी बेकरीच्या किचन रूममध्ये अस्वच्छतेचा कळस पाहून या महिला संतापल्या. यावेळी या बेकरीत कीड लागलेले पाव, उंदराने कुरतडलेले पाव, दुर्गंधी मध्ये बनवले जाणारे केक व बेकरी प्रॉडक्ट्स पाहून साऱ्याच महिला अवाक झाल्या. या बेकरीतील अस्वच्छतेचा पर्दाफाश या महिलांनी उघडकीस आणला. हा सारा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार अन्न सुरक्षा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. मात्र, जिल्ह्यासाठी केवळ दोनच अधिकारी असल्याने संपूर्ण जिल्हा सांभाळणे कठीण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे. यामुळेच की काय या बेकरीधारकांचे फावत आहे, असे बोलले जात आहे.