रत्नागिरी:-सन २०२४ खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये भात व नाचणी या अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ १ रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे योजनेचे वैशिष्ट्ये जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात भात व नाचणी पिकांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. जोखमीच्या बाबी -हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकाच्या हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग ई. बाबींमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान. *योजनेचा हप्ता कोठे भरावा* या योजनेचा विमा हप्ता भरण्याचा कालावधी हा १५ जुन ते १५ जुलै २०२४ आहे. तरी विमा अर्ज आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर बंधनकारक असल्याने ई पीक पहाणी अॕपद्वारे पिकांच्या नोंदी करून घेण्याचे आवाहनही श्री. पांगरे यांनी केले आहे.