रत्नागिरी:- येथील गोळप ग्राम पंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी यावर्षी गावातील त्यांच्या प्रभागातील गरजू २६० कुटुंबांना स्वखर्चाने प्लास्टिक खोळींचे वाटप घरोघरी जाऊन केले.काळे तीन वर्षांपूर्वी गोळप ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही खर्च न करता अपक्ष सदस्य निवडून आले. त्या वर्षीपासून प्रभागात साधारण २७५ कुटुंबांना तीन वर्षे साधारण दहा प्रकारचे भाजीपाला बियाणे त्यांनी मोफत दिले. या कुटुंबांनी त्यांना लागणारी भाजी पिकवावी, हा त्यामागचा उद्देश होता. गेल्या वर्षी प्रभागाबाहेरसुद्धा गावातील एकूण ५०० कुटुंबांना बियाणे दिले. शिवाय डासांची पैदास होऊ नये यासाठी शौचालय पाइपला लावायला जाळी आणि बांधायला धागा स्वखर्चाने उपलब्ध करून दिला दिले.यावर्षी मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध न झाल्याने कोणती उपयोगी वस्तू द्यावी, असा विचार करून शेतकरी कुटुंबांना उपयोगी आणि पावसात शेती आणि इतर कामांना वापरता येईल अशी प्लास्टिकची खोळ प्रत्येक कुटुंबाला द्यावी, असे सुचले. त्याप्रमाणे प्रभागातील ज्यांना आवश्यक नाही आणि उपयोगी नाही अशी काही कुटुंबे वगळता इतर २६० कुटुंबांना खुळ वाटण्यात आली.या उपक्रमाबाबत काळे (९४२२३७२२१२) म्हणाले, शेतकऱ्यांना मी खूप काही दिले असे नक्कीच नाही. मात्र शासनाच्या पैशातून प्रत्येक गोष्ट करताना आपण खूप मोठे उपकार लोकांवर करतोय, असे दाखविण्याच्या सध्याच्या जगात स्वतः करत असलेली छोटी गोष्ट नक्की मूल्यवान आणि मनाला आनंद देणारी आहे. शेतकरी कुटुंबांना आणि मला स्वतःलासुद्धा समाधान वाटते. यातून असंख्य लोकांना प्रेरणा मिळू शकते.