रत्नागिरी:-रत्नागिरी शहराजवळील मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील खडपात मासे गरवण्यासाठी तीन तरुण गेले होते. मासे गरवत असताना पानवल येथील तरुण समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली आहे. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थ शोध घेत असून एका तरुणाला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे चरवेली व पानवल येथे शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरूण रत्नागिरी तालुक्यातील चरवेली व पानवल येथील राहणारे आहेत. मासे गरवत असताना पानवल येथील तरुण राहुल घवाळी समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थ शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चरवेली येथील राहुल राजेंद्र शिंदे 24, दिगंबर अनंत गराटे 20 (दोघे रा. चरवेली, रत्नागिरी) व राहूल घवाळी (वय 24 रा. पानवल, रत्नागिरी) असे सोमवारी 17 जून रोजी दुपारी पावणेचार च्या सुमारास मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील खडपात मासे गरविण्यासाठी गेले होते.
मासे गरवत असताना राहूल घवाळी हा अचानक आलेल्या लाटेत फसला तो समुद्रात ओढला जाऊ लागला. त्यावेळी राहुल शिंदे यांने वाचविण्याच अथक प्रयत्न केला. पाण्याच्या लाटेत वाहून गेलेल्या राहूल घवाळी याने राहुल शिंदे याने पाण्यात टाकलेली मासे गरविण्याचा स्टिकही पकडली होती. पण पाण्याचा प्रवाहात एवढा मोठा होता की तो वाहून गेला. राहुलच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर मिऱ्या येथील काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना व राहुलच्या सोबत असलेल्या मित्रांनी घटनेची खबर शहर पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वाहून गेलेल्या राहूल घवाळीचा शोध सायंकाळी उशिरापर्यत सुरु होता. दरम्यान, या घटनेत बेशुद्ध अवस्थेत आलेला तरुण राहुल शिंदे याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या उपचार सुरु आहेत. सायंकाळी उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र वाहून गेलेल्या राहूल घवाळीचा पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यत शोध सुरु होता.