चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन, मुंबईचा पुढाकार
मुंबईतील सरोज स्विट्सनेही विदयार्थ्यांचे तोंड केले गोड
विद्यार्थी आनंदले, पालकांनी व्यक्त केले आभार
रत्नागिरी प्रतिनिधी:-नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ जिल्हाभरात उत्साहात संपन्न होत असताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरणा मिळावी या हेतूने पावस येथे शैक्षणिक साहित्य आणि गोड खाऊ वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन या मुंबईस्थित सामाजिक संस्थेमार्फत शै क्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण १२०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात येणार आहे. त्याची सुरुवात रत्नागिरी विभागातील ६२६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून पावस येथे झाली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वामी स्वरूपानंद मठात पावस विभागातील १८ शाळेतील एकूण ६२६ विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या भरगच्च उपस्थितीत झालेल्या या वितरण समारंभाला चैतन्यतर्फे संस्थापक श्री. प्रथमेश तेंडुलकर, मुंबईतील सरोज स्विट्सच्या संचालिका सौ. मनीषा मराठे, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन, उद्योजक अनिल पत्याणे, भडे गावचे माजी सरपंच सुधीर तेंडुलकर तसेच मुंबईहून Burns & McDonnell India या कंपनीचे विशेष पदाधिकारी उपस्थित होते.
गाव खेड्यातील, पाड्यातील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन ही संस्था अविरत कार्य करत आहे.संस्थेचे उपस्थित कार्यकर्ते वैभव भुजबळ, पराग जोशी, अनुषा सुवर्णा, अंजली देशपांडे, सविता दोंदे, राजेंद्र देशपांडे, प्रथम सुवर्णा, प्रांजली जोशी, प्रियांका मेंडन तसेच संचालिका दिपाली तेंडुलकर यांच्या सहकार्याने नोंदणी केलेल्या सर्व शाळांना शालेय दप्तर किट आणि गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदोर शाळेचे राजेशकुमार गुरव यांनी केले.गोळप नं. 1 शाळेचे प्रकाश काजवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे जयंतराव देसाई, नाखरे नं. 1 चे पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांनी विशेष सहकार्य केल्याचे संचालिका दिपाली तेंडुलकर यांनी सांगितले. साहित्य पावस शाळेचे गंभीरानंद मदने, मावळंगे संदीप पावसकर, चांदोर रविंद्र मांडवकर यांसह भडे येथील वितरणात ऋषिकेश तांबे, अजय मयेकर तसेच चांदोर, मावळंगे, नाखरे, गोळप, पावस शाळांतील शिक्षकवृंद, पालक,शिक्षणप्रेमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी जनता तसेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत गेले कित्येक वर्षे आनंद फुलवत असणाऱ्या चैतन्य परिवाराचे केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, उत्कर्षा शिंदे, रविंद्र आग्रे, पावस बीट विस्तार अधिकारी सायली सावंत, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, शिक्षणाधिकारी एम. बी. कासार, डायट प्राचार्य सुशील शिवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष अभिनंदन केले आहे.