संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील जलजीवन मिशन योजनेची सर्व कामे रखडली असून या योजनेचे तीन तेरा वाजल्याचे समोर येत आहे . एकाच ठेकेदाराला या भागातील सतरा कामे दिल्याने अपुरे मनुष्यबळ व ढिसाळ नियोजन यामुळे ही योजना पूर्णतः फसली असल्याचे दिसून येते .यावरून कडवईतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी सरपंचाकडे केली आहे .
कडवई ग्रामपंचायत हद्दीतील विविध पाणी योजनांसाठी जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा भरघोस निधी शासनाच्या वतीने देण्यात आला . मात्र मॅनेज टेंडर सिस्टीम मूळे टक्केवारी च्या गणितामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला ही कामे दिल्याने एका ठेकेदाराने सतरा ते अठरा कामे घेतल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे . कडवई जिल्हापरिषद गटातील या ठेकेदारकडे कडवईसह सतरा कामे कार्यरत असल्याचे समजते . मात्र अपुरे मनुष्यबळ व ढिसाळ नियोजन यामुळे या सर्वच कामांचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून येते. कडवईमध्येही हीच परिस्थीती पहायला मिळत आहे . ठेकेदाराकडून कामे सुरू करण्यास विलंब केला गेला . कडवई येथील जलजीवन मिशन ची कामे जानेवारी मध्ये करण्यात आली . सुरवातीलाच या कामात वापरले जाणारे पाइप हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आवाज ग्रामस्थानी उठवला होता. त्यानंतर ही कामे ही निकृष्ठ असल्याचा दावा ग्रामस्थानी केला मात्र ग्रामस्थांचा हा आवाज दाबत कामे चालूच राहिली.
पाणी योजनेची कामे ऐन पाणी टंचाईच्या काळात सुरू करण्यात आली यावेळी पर्यायी व्यवस्था चोख नसल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले. आता पावसाळा सुरू झाला असून ही कामे अर्धवट स्थितीतच असल्याचे दिसून येते .यामुळे ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे .तेरा ते चौदा लाख रुपये खर्च करून जुन्या विहिरीवरच नवीन काम करण्यात आले आहे मात्र हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
ही कामे अर्धवट राहिल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत . नुकतेच ग्रामस्थानी सरपंच विशाखा कुवळेकर व उपसरपंच दत्ताराम ओकटे यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकित ग्रामस्थानी आपल्या संतप्त भावना ही मांडल्या . कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थानी केली यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी आपण ग्रामस्थांचा मागणीशी सहमत असल्याचे सांगितले व ठेकेदार मनमानी करत असल्याचे मान्य केले .
सरपंच विशाखा कुवळेकर यांनी ग्रामस्थांच्या भावनांशी आपण सहमत असून तात्काळ सदर ठेकेदारावर कारवाई व्हावी व त्याची यापुढील सर्व बिले थांबवण्यात यावीत यासाठी वरिष्ठ स्तरावर तात्काळ पत्र देणार असल्याचे आश्वासन दिले . यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमा , अक्षता घरवेकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलिंद चव्हाण , महेंद्र मादगे व ग्रामस्थ उपस्थित होते.