पाली/वार्ताहर:-मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीकच्या खानूगावच्या हद्दीत पेट्रोलपंपाच्या समोर दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील तिघेजण जखमी होऊन एक महिला ठार झाली आहे. या अपघातात दोन्ही दुचाचाकींचेही नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ती पाली पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सुरळीत केली.
या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की,मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीकच्या खानू गावच्या हद्दीत खानु पेट्रोलपंपासमोर काल तारीख १४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गौरव काशिनाथ कडू हा एक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए डब्ल्यू ७४८५ ने वडील काशिनाथ भिवा कडू यांना घेऊन पालीहून मठाच्या दिशेने जात असताना पेट्रोल पंपाच्यासमोर आला असता रस्त्याच्या डाव्या बाजूने येणारे दुचाकी पेट्रोल पंपात जात असताना उजव्या बाजूने येणारे दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए एल २५८८ धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यामध्ये दुसर्या दुचाकी वरील अरुणा सिताराम कोलगे रा. येरवंडे ता. लांजा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ पाली ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले असता त्या उपचारादरम्यान मयत झाल्या आहेत. या अपघातात गौरव काशीनाथ कडू २६, काशिनाथ भीवा कडू ५९, दोघेही रा. मठ कडूगाव, सिताराम यशवंत कोलगे रा. येरवंडे हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची खबर सिताराम कोलगे रा. येरवंडे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे दिल्यावरून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताचा अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.