आरवलीजवळ सुपरफास्ट जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवाशांची 4 तास रखडपट्टी
खेड:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या सुपरफास्ट सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरवलीनजीक बिघाड झाला. या बिघाडाने एक्सपेसच्या प्रवाशांची 4 तास रखडपट्टी झाली. रत्नागिरी येथून मागवण्यात आलेले पर्यायी इंजिन उपलब्ध झाल्यानंतर एक्सप्रेस मडगावच्या दिशेने रवाना झाली. अन्य 5 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही बिघडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्याचे वेळापत्रक आधीच विस्कळीत झाले आहे. त्यात पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणीही सुरू असल्याने रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. 12051 क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस शुक्रवारी आधीच 40 मिनिटे विलंबाने धावत होती. एक्सप्रेस सावर्डे ते आरवलीदरम्यान आली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्यो लोकोपायलटाया निदर्शनास येताच एक्सप्रेसला आरवली स्थानकात थांबा देण्यात आला. याबाबत रेल्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना कळवल्यानंतर रत्नागिरी येथून पर्यायी इंजिनची व्यवस्था करण्यात आली.
पर्यायी इंजिन येईपर्यंत जनशताब्दी एक्सप्रेस आरवली स्थानकात 2 तास थांबवून ठेवण्यात आली होती. अखेर इंजिन जोडल्यानंतर एक्सप्रेस मार्गस्थ होताच खोळंबलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.