चिपळुणात इमारतीचे प्लास्टर करताना पडून दोघांचा मृत्यू
चिपळूण
इमारतीचे प्लास्टर करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून दोघांचा मृत्यु झाल्याची दुर्घटना आज शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेश मारुती शिगवण (36, खेर्डी शिगवणवाडी) आणि पूनम दिलीप सहा (40, खेर्डी शिवाजीनगर, मूळ गाव बिहार) असे या घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरु होते. त्यासाठी दुसऱ्या मजल्यापर्यंत लाकडी पलांजा बांधण्यात आला होता. त्यातील एक बांबू तुटल्याने त्यावर उभे असलेले दोघेजण दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेश मारुती शिगवण याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तसेच त्यांची पत्नी गीता शिगवण हिचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांची मुले पोरकी झाली. तसेच पूनम दिलीप सहा यांना चार मुलं असून त्यांचेही मातृत्व हरपले. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.
