लांजा:- तालुक्यातील कोर्ले येथे विहिरीत अडकलेल्या खवले मांजराला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले. रेस्क्यू करून वनविभागाने खवले मांजराला सुरक्षित विहिरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. कोर्ले येथील शेतकरी सुधाकर गोपाळ कांबळे यांच्या काजू बागेच्या विहिरीत बुधवार 12 जून रोजी दुपारी 3च्या दरम्यान आढळले. सुधाकर कांबळे यांनी लांजा वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे व वनमित्र अमित लांजेकर यांनी घटनास्थळी जाऊन विहिरीत पडलेल्या खवले मांजराला सायंकाळी उशिरा सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्पत तपासणी करून या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रत्नागिरी वनविभागाच्या अधिकारी गिरीजा देसाई, सहायक वनरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे आणि वनमित्र अमित लांजेकर यांनी यशस्वी कामगिरी केली.