रत्नागिरी:- ‘बा देवा,चार व्हयवाटीच्या देवा,आज बालगोपाल मिलून, सालाबादपरमानं तुला नारल देतावं हाय.. वल्या खोबऱ्या-भाताचा निवेद देतावं हाय, ता मान्य करून घे, अनी पोरां-बालांसगट, गुरां-ढोरा, मुला-मानसानत सुकसंपत्ती दे..पावसा-पान्याची, शेता-भाताची भरभराट व्होवंदे..’ असे खणखणीत गाऱ्हाणे घालून कोतवडे गावातील धामेळेवाडीत ‘सजर्नशीलतेचा उत्सव’ असलेली अनोखी ‘गाव-वाफ’ परंपरा पार पडली.यावेळी तांदळाच्या भाकऱ्या, भात आणि कुळथाची उकड अशा चविष्ट प्रसादाचा साऱ्या गावकऱ्यांनी आस्वाद घेतला.कोकणात जितके सण तितक्या त्या सणाच्या विविध प्रथा आणि परंपरा… याच प्रथा-परंपरांनी येथील लोक समृद्ध बनलेले आणि एकमेकांशी घट्ट एकोप्याने बांधून ठेवलेले. कोकणातली शेती हीसुद्धा एक प्रकारचा उत्सवच! त्यामुळे या शेतीच्या उत्सवात प्रथा नसतील तर नवलच. अशीच रत्नागिरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची सर्वांग सुंदर आणि सर्जनशीलतेची पूजा करणारी प्रथा म्हणजे गाववाफ!मृग नक्षत्र लागले, की कोकणात भाताचा पेरा होतो.. कधीकधी त्याआधीही धुळवाफेचा पेरा पडतो. काहीच दिवसात राब रुजून येतो आणि सर्वत्र माळरानावर हिरवे ताटवे दिसू लागतात. एक बी जमिनीत टाकावे.. त्यावर मेघाचे पाणी पडावे आणि ते बीज रुजून यावे, त्यावर पुन्हा धान्य धरावे.. हीच सृष्टीही सर्जनशीलता शेतकर्यांनी अत्यंत श्रद्धेने पाहिली आणि तिला त्याने ईश्वरी चमत्काराचे रूप मानले. त्या सर्जनशीलतेची पूजा केली. ही पूजा म्हणजेच गाववाफ!वाफ म्हणजे रुजलेल्या भाताचा वाफा. पावसाच्या आगमनाने रुजलेल्या वाफ्याबद्दल सार्या गावाने मिळून केलेली कृतज्ञता म्हणजेच गाववाफ! ही प्रथा अतिशय जुनी. गाववाफ आणि नवरात्रोत्सवातील घट यात साधर्म्य दिसते. गावावाफेला शेताची रुजवात करणार्या निसर्गदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त होते, तर नवरात्रोत्सवा ओले घट स्थापन करून त्यातून रुजलेल्या वाफ्याची नऊ दिवस स्थापना होते. यातून शेतकरी बांधवांमध्ये नवनिर्मिती, प्रजनन या गोष्टीला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे दिसून येते.गाववाफ अर्थात सर्जनशीलतेची पूजा करणारी ही परंपरा रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील धामेळेवाडीच्या माळावर पार पडली. गावकर्यांनी सार्या तयारीनिशी माळरान गाठले. तेथे जागा-जुगा साफसुफ केली आणि सगळे एकजुटीने कामाला लागले. कुणी झपाझप जाऊन तीन दगडांची चूल मांडली… कुणी लाकुडफाटा गोळा केला… कुणी भाताचा टोप चढवला.. कुणी गावठी कुळथासाठी आधण लावले. सर्वांत मोठे काम भाकर्या थापणे. त्यासाठी सार्याजणांचा थवा बसला आणि काहीवेळातच पांढर्याधोप, लुसलुशीत शेकडो भाकर्या थापून भाजून तयार झाल्या. त्यानंतर गावकरी मंडळी स्थानावर पूजेला लागली. स्थानदेवतेला, निसर्गदेवतेला आवाहन केले गेले. नारळ-विडा ठेवला. भात, भाकर्या आणि कुळथाच्या उकडीचा खास नैवेद्य निसर्गदेवतेला ठेवला. वाडीच्या गावकरांनी साद घातली.सारे गावकरी धरतीला हस्तस्पर्श करून उभे राहिले. ‘बा देवा, आज व्हया टिकानी उबं र्हावनं, तुज्यासमोर तुजी बाल-गोपाल, लेकरा उबी हाय… सालाबादपरमानं, तुजा नारल-इडा तुला देलीला हाय.. ता मान्य करून घे.. पोरा-बालात, गुरां-ढोरांत, मुला-मानसात सुकसंपत्ती देस.. पैशा-अडक्यात, नोकरी-धंद्यात यास देस.. शेता-भातात बरकत देस.. तुज्या आशीरवादानं, भाताचा पेरा केलीला हाय.. तेला कोंबारा फुटलीला हाय, तेच्या पेरात ताकद भरून दान्यानं-दान पदरात घाल, अनी पावसा-पानयाची बरसात करून सोन्याची दिस दाकवं.. बरकत आन.. अनी संबाल कर रं बा राजा..’ असे खास खणखणीत गार्हाणे निसर्गशक्तीला घातले गेले. त्यानंतर सार्या महाप्रसादाचे गप्पा-गोष्टी मारत वनभोजन पार पडले.