मगरींचा नैसर्गिक अधिवास म्हणून चिपळूणमधील शिवनदीची होतेय ओळख
चिपळूण: शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवाहीत होणारी सुमारे तीन कि. मी. लांबीच्या शिव नदीचे पात्र आता मगरीचे नैसर्गिक अधिवास म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे. या पात्रात गेली अनेक वर्षे शेकडो मगरी मुक्तपणे संचार करीत असल्या तरी अनेकदा या मगरी नागरी वस्तीतही शिरकाव करीत असल्याचे दिसून येत आहे.शिव नदीपात्रात मगरीना आवश्यक असणारे खाद्य उपलब्ध होत असल्यामुळे या मगरीचा मुक्त वावर होऊ लागल्याने आता चिपळूणची शिव नदी मगरीचा नैसर्गिक अधिवास म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. शहरानजीकच्या कामथे फणसवाडी येथून सुरू झालेली शिव नदी पागमळा परिसरापासून पुढे खेंड परिसर ते बाजारपेठ मार्गे खाटीक गल्लीच्या टोकावर वाशिष्ठी नदीला मिळते, सुमारे तीन कि.मी. लांबीचा प्रवास करून प्रवाहित होणारी ही नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवाहीत होते. काही वर्षापासून या नदीमध्ये मगरींचे अस्तित्व दिसून येऊ लागले. प्रामुख्याने वाशिष्ठी नदीत खाडीच्या मार्गाने मगरी येत असत. आता मात्र शिवनदीपत्रात पाग परिसरातून खाटीकआळी परिसरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक मगरी मुक्तपणे वावरताना दिसून येत आहेत. या पात्रातील किनाऱ्यानजिक अनेक मगरींची घरटी आहेत. विणीच्या हंगामात या मगरी घरट्यांच्या माध्यमातून वंश विस्तार करीत असल्याचे निसर्गप्रेमींच्या अभ्यासातून पुढे आले आहे. गेल्या काही वर्षांत या मगरींचा शिरकाव शहरातील पागझरी वस्तीमध्ये होऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे. काही बहुमजली इमारतीच्या पार्किंग जागेमध्ये मगरी आल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने पावसाळी हंगामात शहरात पुराचे पाणी शिरल्यानंतर शिव व वाशिष्ठी नदीपात्रातील मगरी देखील या पुराच्या पाण्यात जलविहार करीत नागरी वस्तीमध्ये शिरकाव करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी संख्येने कमी असलेल्या मगरी पाहण्यास शिव नदी पूल परिसरात नागरिकांची गर्दी व्हायची. खेडेकर संकुलामागील माधव पूल म्हणून ओळख असलेल्या लोखंडी साकवावर नदीपात्रातील मगरी पाहण्यासाठी सार्यकाळी उशिराने जमलेल्या नागरिकांमुळे लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात काहीजण थेट मगरीच्या जवळच कोसळले होते. त्यावेळी पात्रात पडलेल्यांची मगर पाहण्याच्या नादात भंबेरी उडाली, जीव वाचविण्यासाठी अनेकांनी सुरक्षितपणे पलायन केले होते. या घटनेनंतर मात्र नागरिकांचा मगरी पाहण्याचा छंद कमी झाला होता, तर या घटनेनंतर काही वर्षांच्या कालावधीत नदीपात्रामध्ये मगरीची संख्येत वाढ होऊन आजच्या घडीला दीडशेहून अधिक मगरीचा वावर दिसून येत आहे. दोन ते पंधरा फुटापर्यंत पूर्णतः वाढलेल्या मगरी वावरत आहेत. पात्रामध्ये चायनिज, चिकन सेंटर, यासह टाकऊ मांसाहारी पदार्थ टाकत असल्याने या मगरींना सहज खाद्य उपलब्ध होऊ लागले आहे. एकूणच परिस्थिती पाहता शिव नदीपात्राची ओळख आता मगरींचा नैसर्गिक अधिवास म्हणून होऊ लागली आहे.