चिपळूण: तालुक्यातील कुंभार्ली घागवाडी येथे वीज बिलावरून सख्ख्या तिघा भावांनी सख्ख्या भावास मारहाण केली. यामध्ये समीर रघुनाथ जाधव जखमी झाले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ११ जून रोजी घडली आहे.याबाबतची फिर्याद समीर रघुनाथ जाधव (३०) यांनी दिली असून यानुसार त्यांचेच भाऊ संकेत रघुनाथ जाधव, सुरज रघुनाथ जाधव व सौरभ रघुनाथ जाधव (सर्व राहणार कुंभार्ली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेसंदर्भात सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी समीर रघुनाथ जाधव यांनी आपल्या मूळ घराच्या शेजारी नवीन घर बांधले. मात्र, या घरात त्यांनी जुन्या घरातूनच वीज पुरवठा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र वीज पुरवठा नवीन घरात घेतला नाही. यावरून समीर जाधव व त्यांचे भाऊ संकेत रघुनाथ जाधव , सूरज रघुनाथ जाधव, सौरभ रघुनाथ जाधव यांच्यामध्ये वीज बिल भरण्यावरून वाद सुरू होते. मात्र, दि. ११ जून रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास सख्ख्या भावंडांमध्ये वीजबिल भरण्यावरून वाद झाले. यातून सुरज व सौरभ, संकेत या सख्या भावाने आपला सखा भाऊ समीर यांस मारहाण केली. यामध्ये संकेत यांनी समीर यांच्या डोक्यात काठी हाणली. यामुळे समीर जखमी झाले आहेत. याबाबत फिर्यादी समीर जाधव यांनी अलोरे- शिरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार संकेत, सुरज, सौरभ जाधव या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.