देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील १९ दुर्धर आजारग्रस्त नागरिकांना गुरुप्रसाद संस्थेने अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका मिळवून दिल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुरुप्रसाद संस्था रत्नागिरी ही नेहमी दुर्धर आजारग्रस्त नागरिकांकरीता काम करीत असते. विविध शासकीय योजनाचा अशा व्यक्तींना लाभ मिळवून दिला जातो. संगमेश्वर तालुक्यातील अशा व्यक्तींना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी १९ अर्ज संस्थेने तहसीलदार संगमेश्वर यांचे कार्यालयात सादर केले होते. शासन स्तरावर सुद्धा वंचित जनसमूहांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संपूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच बाळगण्यात येतो. त्यानुसार संगमेश्वर तहसिलदार अमृता साबळे यांनी या प्रकरणांची तातडीने छाननी करून ज्या काही त्रुटी दिसून येत होत्या त्या दूर करण्यास सांगण्यात आले.
संस्थेने सुद्धा या त्रुटी तातडीने दूर केल्या. विशेषतः दुर्धर आजारग्रस्तांना अंत्योदय शिधापत्रिकाच मिळवून देण्यासाठी संस्था कायम प्रयत्न करीत असते. अशाप्रकारे संपूर्ण अर्ज निर्दोष रीतीने सादर करून घेऊन तहसीलदार अमृता साबळे यांनी तातडीने कार्यवाही करून अशा व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिधापत्रिकांचे वितरण नुकतेच तहसीलदार यांच्या दालनात करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार अमृता साबळे, प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी जे. एस. पंडित , पुरवठा निरीक्षक अक्षय सतरकर , पुरवठा महसूल सहाय्यक राहुल शिंगे , विकास चव्हाण यांसह पुरवठा शाखेतील अन्य कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी तहसीलदार अमृता साबळे यांनी या व्यक्तींसोबत व्यक्तिगत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. उत्तम जीवन जगण्यासाठी त्यांना शुभेच्छा ही दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्यकर्ते मीरा चव्हाण, रचना कारेकर, सुनील जाधव उपस्थित होते.
दुर्धर आजारग्रस्तांना गुरुप्रसाद संस्थेने मिळवून दिल्या अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका
