अभाविप,जागरूक नागरिक, हॉटेल व्यवसायिकांचा दावा
पोलिसांना दिले निवेदन, पोलिसांकडून चौकशी सुरू
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरीतील शासकिय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरील जागरूक नागरिकांनी समोर आणला आहे.
संबधीत प्रकाराची तक्रार अभाविपने एका निवेदनाद्वारे स्थानिक स्थानिक पोलीस यंत्रणेकडे केली आहे. शासनाकडून सुमारे दिड वर्षांपूर्वी रत्नागिरीत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले होते. अनेक व्यवसायिक अभ्यासक्रम याठिकाणी सुरू आहेत. पण या चालवल्या जाणाऱ्या या कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस प्रशिक्षणार्थी बसवून परिक्षा घेतल्या जात असल्याची कुणकूण येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जागरूक नागरिक यांना लागली होती.
याप्रकरणी मंगळवारी दुपारी अभाविपचे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक तसेच हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी कौशल्य विकास केंद्रात धडक दिली. त्याठिकाणी सुरू असलेल्या प्रशासनाकडे याचा जाब विचारत हा प्रकार समोर आणून दिला. ज्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचे काम सुरु असल्यो कौस्तुभ सावंत, ठाकुरदेसाई यांनी सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बनावट विद्यार्थ्यांना बसवण्यात येत असल्या खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
या साऱ्या प्रकाराबाबत अभाविपने स्थानिक पोलीसांकडे लेखी निवेदन दिले आहे. घडल्याप्रकाराची खबर मिळताच शहर पोलिसांनी देखील कौशल्य विकास केंद्रात धाव घेतली होती. अभाविप व जागरूक नागरिक, हॉटेल व्यवसायिक यांच्या मागणीनुसार त्याठिकाणी परिक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती संकलीत करण्यी कार्यवाही पोलिसांनी हाती घेतली. त्यामुळे याप्रकरणात घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेत पोलीस अधिक तपास सुरू केला आहे.