चिपळूण:-निकृष्ट रस्ताचे काम, सातत्याने होणारे वाहनचालकांचे अपघात व ठेकेदार, अभियंता चर्चेला सामोरे येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी चिपळूण-गुहागर मार्गावर एकत्र येत सोमवारी महामार्ग रोको केला होता. या आंदोलनप्रकरणी पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यानुसार 18 आंदोलनकर्त्यांवर चिपळूण पोलीसांनी प्रतिबंधनात्मक कारवाई केली आहे.
चिपळूण ते गुहागर या मुख्य मार्गाला जोडणारा रामपूर ते देवखेरकी-नारदखेरकी हा रस्ता कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेसात कि.मी.ाया रस्त्यासाठी सुमारे 5 कोटीचा हा रस्ता मंजूर झाला. या रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उपअभियंता चिपळूण यांच्या देखरेखीखाली सुरु आहे. असे असताना या रस्त्याचे काम सुरु करताना सुरवातीला डांबरीचा कोट न देता त्यावर खडी व ग्रीट टाकून रस्त्याचे काम सुरु केले. भर पावसात हे काम सुरु झाल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. या रस्त्याच्या वारंवार झालेल्या तक्रारींची अभियंता व ठेकेदाराने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या या भागातील ग्रामस्थांनी चिपळूण-गुहागर मार्गावरील रामपूर येथे एकत्र येत महामार्ग रोखला होता. या आंदोलनानंतर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यानुसार पोलीसांचा आदेश न मानणऱ्याजवळपास 18 आंदोलकर्त्यांवर पोलीसांनी प्रतिबंधनात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या आंदोलकर्त्यांनी नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला.
चिपळुणात महामार्ग रोखणाऱ्या 18 जणांवर कारवाई!
