दापोली:-दापोली तालुक्यातील जालगाव येथील जमीन शेतकरी असल्याचा खोटा दाखला देऊन खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे पुणेस्थित एकावर गुन्हा दाखल झाला असून यामुळे तालुक्यात बनावट कागदपत्र सादर करून जमिनी खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांचे धाबे दणाणले आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल लिमये (58, सदाशिव पेठ, पुणे) यांनी 30 मार्च 2011 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय दापोली येथे खरेदीखत केले. सदर खरेदीखत जालगाव ग्रामपंचायत हद्दीतील 33 गुंठे जमिनीचे असून चिंतामणी फाटक, नयन फाटक (दोघेही रा. विद्यानगर अलिबाग) यांना सुमारे 6 लाख रुपये देऊन खरेदी करण्यात आले.
दापोली दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करीत असताना लिमये यांनी शेतकरी कुटुंबातील नसताना तसे दाखवण्यासाठी स्वतच्या नावे शेत जमिनीचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे होतले येथील खोटा सातबारा तयार करून खरेदीखत केले व शासनाची फसवणूक केली. अशी फिर्याद जयदीप जयवंत बलकवडे यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. या फिर्यादीनुसार दापोली पोलीस स्थानकात भा.दं.वि. कलम 420, 468 ,471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दापोली पर्यटन दृष्ट्या विकसित होत असताना पुणे, मुंबई येथून दापोलातील जमिनी घेणाऱ्याचे प्रमाण मोठे आहे. या जमिनी खरेदी करीत असताना शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून जमिनी खरेदी केल्याचे पुढे आल्याने दापोलीत खळबळ माजली आहे. अशा प्रकारे आणखी कोणते व्यवहार झाले आहेत का? याची पाहणी करणे आवश्यक ठरले आहे.
शेतकरी असल्याचा खोटा दाखला देऊन शासनाची फसवणूक
