रत्नागिरी:-भारत संचार निगम लिमिटेडची कोळंबे ता. रत्नागिरी येथून चोरीस गेलेली केबल पोलिसांनी जप्त करुन दोघा तरुणांना अटक केली होती. न्यायालयात चाललेल्या खटल्यात ओळख परेड नाही तसेच अन्य पुरावे त्रोटक आहेत. असे दिसून आल्याने दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अभय अविनाश घडशी हे बिएसएनएल मध्ये नोकरीला आहेत. त्यांनी पोलीसात फिर्याद नोंदवली. त्यामध्ये नमूद केले की 4 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 वाजता कोळंबे येथील टेलिफोन टेक्निशिअन प्रभाकर आलीम हे परिसरातील लॅडलाईन बंद असल्याबाबत पाहणी करण्याकरीता गेले होते. त्यांना कोळंबे बागवाडी पुलावर 65 व 72 मीटर केबल कोणीतरी चोरुन नेल्याचे दिसून आले. म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणामध्ये तपास अधिकारी नरेंद्र भिकाजी जाधव, मनोहर आगाशे, सचिन भितळे, विनय तोडणकर, दिनेश कदम, समीक्षा हातीसकर आदींची साक्ष नोंदवण्यात आली.
हे प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकारी रा. म. चौत्रे यांच्या समोर चालले. न्यायालयाने समोर आलेले पुरावे लक्षात घेऊन निर्णय दिला. या निर्णयात नमूद करण्यात आले आहे की साक्षीदारांनी दोन तरुणांनी पळून जाताना पाहीले परंतू त्या तरुणांची अटकेनंतर ओळख परेड घेण्यात आली नाही. चोरीस गेलेली केबल आणि जप्त झालेली केबल ही तीच आहे असे शाबित करणारे पुरावे न्यायालयासमोर शाबित झाले नाहीत. म्हणून न्यायालयाने चोरीच्या आरोपाखाली अटक केलेले संदीप उर्प संजय कृष्णाप्पा जाधव ( रा. कर्नाटक राज्य सध्या चिंचखरी ता. रत्नागिरी) आणि तुकाराम मोतीलाल चव्हाण( रा. कर्नाटक राज्य सध्या चिंचखरी ता. रत्नागिरी) यांना निर्दोष मुक्त केले.
केबल चोरीप्रकरणातून दोघांची निर्दोष मुक्तता
