चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते फाटा येथे एकाच रात्रीत वेगवेगळया तीन अपार्टमेंटमधील तीन सदनिका चोरट्यानी फोडल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीतून दिड तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरट्यानी लंपास केल्याची माहिती पुढे येत आहे. घटनास्थळी श्वास पथकासह ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते.
शहरातील बहाद्दुरशेख नाक्यापासून काही अंतरावर कळंबस्ते फाटा असून त्याठिकाणी अनेक इमारती विकसीत झाल्या आहेत. त्यापैकी विठाई, मायमाऊली तसेच निसर्ग या तीन अपार्टमेंट आहेत. या तीन अपार्टमेंट मधील तीन सदानिकाधारक शनिवारी सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर गेले होते. असे असताना सदानिका बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यान त्या सदनिकेच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून त्याव्दारे सदनिकेत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दिड तोळे सोने तसेच 25 हजाची रक्कम चोरल्याची माहिती पुढे येत आहे. या चोरी घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळाची पहाणी केली.
या चोरीचा पंचनामा करण्यात आला असून सायंकाळी रत्नागिरीहून श्वास पथकासह ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
चिपळुणात एकाच रात्री तीन फ्लॅट फोडून दागिने लंपास
