चिपळूण:-भरधाव वेगात असलेल्या मद्यपी ट्रक चालकाने थेट वीज खांबाना धडक दिल्याची घटना चिपळूण-कराड मार्गावरील पोफळी-सय्यदवाडी येथे काही दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी त्या मद्यपी ट्रक चालकावर शुक्रवारी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवाप्पा बसाप्पा मुतेनवार (40, मुगनट्टी, ता. यरगट्टी जि. बेळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अब्दुल्ला उमर सय्यद (45, पोफळी-सय्यदवाडी) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोफळी- सय्यदवाडी देवाप्पा मुतेनवार दारुचे सेवन करुन त्याच्या ताब्यातील 16 चाकी ट्रक हा चिपळूण ते कराड मार्गाने चालवत होता. असे असताना तो पोफळी सय्यदवाडी येथे आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने पोफळी-सय्यदवाडी क्र.1 येथील रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या विद्युत वीजखांबाना धडक देऊन अपघात केला. तसेच या अपघाताची खबर न देता पळून गेला असता त्याचा पाठलाग करुन नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात धडक दिलेला वीजखांब तेथील घरावर पडल्याने त्या घराचे नुकसान झाले.