खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथे ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पारस अशोक सांडे (19, रा. पेढांबे-अलिबाग) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
प्रथमेश गणेश पाटील (19,रा. हाशिवरे-अलिबाग) असे जखमी सहकाऱ्याचे नाव आहे. तो पल्सर कंपनीच्या दुचाकीवरून (एम.एच.06/सी.जी.3817) पारस सांडे यांच्यासमवेत वडखळ बाजूकडून कोलाडच्या दिशेने जात होता. यावेळी हॉटेल गुलमोहरनजीक पाठीमागून येणाऱ्या एस.के.ब्रदर्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालवाहू ट्रकने (आर.जे.14/जी.एन. 4311) धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पारस सांडे हा ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर प्रथमेश पाटील यास गंभीर दुखापत झाली. अपघाताचे वृत्त कळताच नागोठणे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहून जखमीस मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रकमधील दोन्ही चालकांनी घटनास्थळावरून पोबारा केला. नागोठणे पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून दोन्ही फरारी चालकांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कालसेकर करत आहेत.