जीएसटी रक्कम भरण्यास ठेकेदाराकडून असमर्थता
पुन्हा निविदा प्रकिया,चालकांचे वेतन रखडले
गुहागर:-रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी रुग्णवाहिका सेवेचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराला एकूण रकमेवरील जीएसटी रक्कम न दिल्याने त्याने ठेका घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले 2 महिने रखडले आहे. प्रसंगी ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला असून आता नव्याने ठेका निविदा काढण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालकांचे वेतन ठप्प राहणार आहे. दरम्यान, या विरोधात सर्व रुग्णवाहिका चालकांनी 10 जूनपासून रुग्णवाहिका सेवा बंद करण्यात इशारा दिला असून असे पत्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याना दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 102 रुग्णवाहिका गेली 20 वर्षे अहोरात्र 24 तास विनाअपघात सेवा देत आहेत. या रुग्णवाहिका सेवेचा ठेका विनसोल सोल्युशन प्रा.लि. पुणे या कंपनीला 13 मार्च 2024 पासून देण्यात आला आहे. चालकांच्या वेतनापोटी वर्षाला सुमारे 1 कोटी 18 लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे. मात्र जीएसटीच्या रकमेवरुन जि. प. आरोग्य विभाग व ठेकेदार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
ठेकेदाराने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही जीएसटी रक्कम मिळाल्याशिवाय काम करु शकत नाही. या सेवेवर जीएसटी रक्कम असताना आम्ही ती स्वत भरु शकत नाही. आम्ही सरकारी क्षेत्रातील इतर समान कामांच्या ऑर्डरसह एकाच आधारे काम करतो, जीएसटी मिळाल्याशिवाय आम्ही कर्मचाऱ्याना वेतन देऊ शकत नसल्याचे पत्रात म्हटले आहे.