राजापूर:-तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून गेले 2 दिवस तालुक्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान पावसामध्ये शुक्रवारी रात्री मिठगवाणे शाळा नं.3 ची संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले. शुकवारी राजापूर शहरातील भटाळी येथे वीजवाहिन्यांवर झाड पडल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
मागील 2-3 दिवस तालुक्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे गेली 2-3 महिने उकाड्याने हैराण झालेल्या तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे. पावसाला सुरूवात झाल्याने तालुक्यात पेरणीची कामेही सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान शुक्रवारी पडलेल्या पावसात रात्री मिठगवाणे शाळा नं.3 ची संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.