चिपळूण:-दिशाभूल करुन बँक खात्यातील 1 लाख 98 हजार 280 रुपयांची रक्कम ई स्टोअर वेदीकोअर कंपनीच्या खात्यावर वळवल्यानंतर ते पैसे न दिल्याची घटना 5 ते 7 मे 2022 दरम्यान पालवण-कोष्टेवाडी येथे घडली. हा प्रकार पुढे येताच याप्रकरणी तब्बल 2 वर्षांनी एका 25 वर्षीय तरुणावर सावर्डे पोलीस स्थानकात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
प्रितम चंद्रकांत उकार्डे (25) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याची फिर्याद सीताराम शंकर पाणिंद्रे (66) यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सीताराम पाणिंद्रे यांना प्रितम उकार्डे याने ई स्टोअर वेदीकोअर कंपनीबाबत माहिती दिली. या कंपनीत पैसे गुंतवल्यास ई स्टोअरमध्ये किराणा सामानाची खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळेल, तसेच गुंतवलेल्या 22 आयडीवर प्रत्येक महिना एकूण 8 हजार 991 एवढी रुक्कम 36 महिने मिळत राहील, असे सांगून पाणिंद्रे यांची दिशाभूल केली. पाणिंद्रे याच्या नावे एकूण 22 आयडी तयार करुन त्यांच्या ऍक्सिस बँक खात्यातून 1 लाख 98 हजार 280 रुपये एवढी रक्कम 5 ते 7 मे 2022 या कालावधीत ई स्टोअर वेदीकोअर कंपनीच्या खात्यावर वळवून घेतली. त्यानंतर पाणिंद्रे यांना अद्यापपर्यंत त्याचे पैसे परत न दिल्याने यातून त्यांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार पुढे येताच या प्रकरणी उकार्डे याच्यावर सावर्डे पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.