रत्नागिरी:-विदर्भ, मराठवाड्यात अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटना घडत असताना आता याचे लोन रत्नागिरीत पसरले आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळू चोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरी पांढरा समुद्र येथे शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीमती हर्षलता धनराज गेडाम ( ४९) यांनी हा हल्ला परतवून लावत दोघांना चांगला धडा शिकवला. त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती हर्षलता गेडाम या पांढरा समुद्र येथे मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. समुद्र किनारी फिरताना त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सुंदर समुद्र किनारा टिपण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समुद्र किनाऱ्यावर चोरटी वाळू भरण्यासाठी आलेल्या २ बोलेरो पिकअप गाड्यातील चोरांना संशय आला. आपलाच फोटो किंवा शूटिंग केल्याचे त्यांना वाटले. श्रीमती गेडाम शुटींग करीत असल्याचे पाहून या गाडीतील एका इसमाने आमच्या गाडीचा फोटो काढताय का? असे विचारले. त्यावर गेडाम यांनी नाही असे उत्तर दिले. यानंतर श्रीमती गेडाम आपल्या निवास स्थनाकडे निघाल्या, एवढ्यात सफेद रंगाची वाळूने भरलेली बोलेरो गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातील एकाने आमच्या गाडीचा फोटो तुम्ही काढलात तो मोबाईल आम्हाला द्या असे दरडावले. याचवेळी एका इसमाने खाली उतरून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गेडाम यांनी सावध पवित्रा घेत बचावासाठी त्याच्या चेहऱ्यावर पायाने कराटे किक मारली. त्यामुळे तो खाली पडला. लगेचच दुसरा व्यक्ती गाडीतील फावडे घेऊन अंगावर गेडाम यांच्या अंगावर धावून आला. यावेळीही त्यांनी सिनेस्टाईल पाठीमागून एक कराटे किक मारून खाली लोळवले. ही घटना घडताच समुद्रावर उभ्या असणाऱ्या बोलेरो पिकअप गाड्या व ट्रकमधील इसम धावत येऊ लागले असता श्रीमती गेडाम यांनी धावत जाऊन रेमंड रेस्टहाऊस गाठले. त्यानंतर शहर पोलिसात याबाबत तक्रार दिली. श्रीमती गेडाम यांच्या तक्रारी नुसार ९ रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३५२, ३४ नुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती गेडाम यांनी आपल्या मोबाईल मधील सर्व फुटेज पोलिसांना दिले आहे. त्यामुळे आता पोलीस कोणती कारवाई करतात हे पाहावे लागेल.