चिपळूण: सावर्डे परिसरातील महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करावी. सदर कामांची तत्काळ पूर्तता न केल्यास लवकरच इंदिरा काँग्रेसतर्फे आंदोलन घेडण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रफिक मोडक यांनी दिला आहे.
सावर्डे हे गाव आजूबाजूच्या ४० ते ५० गावांशी जोडलेले गाव आहे. तसेच शैक्षणिक दृष्ट्या शाळा, कॉलेजेच्या माध्यामातून हजारो विद्यार्थ्यांची वर्दळ असते. तसेच हजारो लोक विविध कामाच्या माध्यमातून सतत ये-जा करतात त्यांच्या सुरक्षितेच्या माध्यमातून तसेच गटारे, पाण्याचा निचरा, डिव्हायडर, डायव्हर्जन, फुटब्रिज, ओव्हर ब्रिज इ. विविध माध्यामातून येणाऱ्या समस्यांबाबत वेळोवेळी चेतक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तसेच उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग चिपळूण यांचेकडे लेखी तसेच तोंडी स्वरुपात तक्रारी करूनही सदर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य लोकांच्या जीवितास धोका आहेच, परंतु व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. सुरुवातीच्या पावसातच सर्व्हिसरोड डिव्हायडरची माती सर्व्हिसरोडवर येऊन चिखल होत आहे. त्यामुळे दुचाकी अपघाताची शक्यता आहे.
डिव्हायडरवरची माती काही ठिकाणी जास्त, काही ठिकणी कमी आहे. तर काही ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी सर्व्हिसरोडवर चिखल माती, पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. आणखी सर्वात महत्वाचे म्हणजे साईड गटाराला काही ठिकाणी वरून भगदाडे पडली आहेत. मुख्यतः हायस्कूलशेजारी यामध्ये विद्यार्थी पडून जीवितहानी होऊ शकते. अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. मागे बाजारपेठेत एक गरीब महिला गटारामध्ये पडून पाय मोडला होता. तिला कोणीच मदत केली नाही. हायवेच्या मधल्या डिव्हायडरमध्ये अजून झाडे लावलेली नाहीत. हायस्कूलच्या सुमारे ३००० विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी फुट ब्रिजची मागणी केली होती. त्याचे काहीच झाले नाही. लहान विद्यार्थी रस्ता ओलांडताना अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. याला जबाबदार सर्वस्वी महामार्गवालेच राहतील याची नोंद घ्यावी अशा प्रकारच्या तीन ब्रिजची मागणी केली आहे.
सावर्डेत अपघात सुरूच आहेत.
पोलीस स्टेशनची नोंद बघितल्यावर याचे प्रत्यय येते. हायवे, सर्विस रोड, डीव्हायडर, गटारे यामधील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. तसेच फक्त सावर्डे ते चिपळूण दरम्यान डायव्हर्जनच विचार करता प्लॅन मध्ये नसणारे अनावश्यक डायव्हर्जन दिलेत ज्यामुळे अपघाताची शक्यता आहे. ज्याला खरी गरज आहे, ज्याच्या रोजीरोटीचा प्रश्न होता त्याला नाकारलेत. त्याचा व्यवसाय कायमचा बंद करण्यास लावला अशीही उदाहरणे आहेत, तसेच सावर्डे ग्रामपंचायतचा रँम्प, त्या शेजारचा संकुल जेथे ३०-४० व्यापारी आहेत. या रॅम्पवर अजून डांबर टाकलेले नाही. त्या ठिकाणी गाड्या घसरत आहेत. तसेच लोकही पडत आहेत. अशा अनेक समस्या निदर्शनास आणूनही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व चेतक कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. तरी सदर कामांची तत्काळ पूरता न केल्यास लवकरच इंदिरा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रफिक मोडक यांनी राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता व चेतक कंपनीला दिला आहे.