समितीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
चिपळूण (प्रतिनिधी) : गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील मुंबई-गोवा महामार्गालगत देशी वृक्ष लागवड करण्यात येत नाही. या विरोधात महामार्ग वृक्ष लागवड हक्क समितीच्यावतीने दि. १० रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी समितीचे सतीश कदम, किशोर रेडीज, बापू काणे, शाहनवाज शाह, अशोक भुस्कुटे, अजय भालेकर आदी उपस्थित होते. यावेळी सतीश कदम म्हणाले की, गेली दोन वर्षे आम्ही सातत्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित ठेकेदार कंपनी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, महामार्गालगत वृक्ष लागवडीबाबत कोणत्याही यंत्रणेकडून ठोस माहिती मिळत नाही. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाकडे १७ कोटी देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात या बाबतही अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही. गतवर्षी आ. शेखर निकम यांनी पुढाकार घेत चिपळूण प्रांताधिकारी कार्यालयात महामार्गलगत देशी वृक्षरोपे लावावीत यासाठी बैठक घेतली. यानंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, काही ठिकाणी झाडे लावण्यात आली. परंतु वर्षभरात ही झाडे कोठेही दिसेनाशी झाली आहेत. चौपदरीकरण काम करणाऱ्या कंपनीला दुतर्फा झाडे लावणे व त्याचे संगोपन करण्यासाठी निधीची तरतूद आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनी चालढकल करीत आहे. कशेडीपासून राजापूरपर्यंत कोठेही झाडे लावलेली नाहीत. काही ठिकाणी आकेशिया लावण्याचा प्रयत्न झाला, तोही हाणून पाडण्यात आला. त्यामुळे आता प्रशासनाच्या विरोधात उपोषण केले जाणार आहे. शाहनवाज शाह म्हणाले, चौपदरीकरणाचे काम करताना मोठ्या प्रमाणात झाडांची तोड झाली. मात्र, लागवडीबाबत कोणत्याही उपाययोजना नाहीत. तापमानवाढ, पावसाचे असंतुलन यामुळे समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे ही झाडे कोणत्याही परिस्थितीत लावली पाहिजेत असे सांगितले. बापू काणे व किशोर रेडीज म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग हा ग्रीन कॉरिडॉर आहे. मात्र, नुसतीच घोषणा झाली. रस्त्याच्या कडेला झाडे लागली नाहीत. ठेकेदार कंपनीने फक्त काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले. मात्र, अन्य अनेक कामे अपूर्ण आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून आता चिपळूण प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.