गाव विकास समितीचे उदय गोताड यांचा सवाल
रत्नागिरी:- कोकणात कुणबी समाज 70% तरीही कुणबी समाजाचे दोन उमेदवार पराभूत झाले. कुणबी समाजाच्या नावाने राजकारण करणारा कुणबी समाजोन्नती संघ या निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावत होता?याचे उत्तर त्यांनी समाजाला द्यावे, असे जाहीर आव्हान गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी दिले आहे.
प्रत्येक निवडणुकीत कुणबी समाजाच्या पाठिंब्यासाठी धनाड्यशक्तीचे उमेदवार हे धडपड करतात. मागील काही निवडणुकींचा अनुभव घेतला तर कुणबी समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी काही मोजक्या लोकांना हाताशी घेतले जाते आणि संपूर्ण समाज जणू काय कुणाची तरी जहागीरदारी आहे असं समजून समाजातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार होतो हे प्रकार लोकशाही व्यवस्थेत थांबले पाहिजेत.
कोकणात यावेळी कुणबी समाजाचे दोन उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे होते.रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून काका जोयशी तर रत्नागिरी रायगड मधून अनंत गीते उमेदवार म्हणून उभे होते.या दोन्ही कुणबी समाजाच्या उमेदवारांसाठी समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आणि समाजाच्या नावाने राजकीय भूमिका घेणाऱ्या लोकांनी काय भूमिका घेतली हे समाजातील जनतेला कळायला हवे.70% समाज असतानाही कुणबी समाजाचे दोन्ही उमेदवार पराभूत कसे झाले याचे उत्तर समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी द्यायला हवे. कुणबी समाजउन्नती संघाची भूमिका या लोकसभा निवडणुकीत काय होती ही कोकणातील जनतेला कळायला हवी असे रोखठोक मत गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी व्यक्त केले आहे.