जि.प.सीईओ किर्तीकिरण पूजार यांनी घेतली गंभीर दखल
रत्नागिरी:-शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीत रस्त्याकडेला जास्त कचऱ्याचा ढीग दिसून येतो. याची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. त्या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायतीनी प्रयत्न करावेत. तसेच जागोजागी फलक लावून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून दंडात्मक कार्यवाही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावी, अशा सक्त सूचना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी दिल्या आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद रत्नागिरीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा 2 अंतर्गत 5 जून 2024 रोजी मान्सूनपूर्व स्वच्छता श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गावांमध्ये सार्वजनिक कचऱ्याचे ढिगारे असलेली ठिकाणी, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व मंदिरे, शासकीय कार्यालये, नदी परिसर, बाजार परिसर अशा ठिकाणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे ग्रामपंचायतीत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत स्वत: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, व जिल्हा परिषद रत्नागिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी सहभागी होवून मार्गदर्शन केले. यामध्ये शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यावर जास्त कचऱ्याचे ढिगारे दिसून येत असल्याची गंभीर दखल पूजार यांनी घेतली आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील व्यापारी, ग्रामस्थांचे प्रबोधन करुन घनकचरा व्यवस्थापन योग्य पध्दतीने करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पूजार यांनी केले आहे.