तणावाचे वातावरण,अनेक जखमी
मुंबई:- पवई येथे भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पवईच्या जय भीम नगर येथे अतिक्रमण विरोधी कारवाई आज सकाळी १०.३० वाजल्यापासून पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात येत होती. पालिकेच्या एस विभागाकडून या भागात याआधीच तोडक कारवाईची नोटीस देण्यात आली होती. पालिकेच्या नोटीसनंतरही अतिक्रमण झालेल्या जागेतील बांधकाम हटवलं न गेल्यामुळे पालिका आणि पोलिसांनी आज याठिकाणी तोडक कारवाई सुरू केली होती. पालिकेच्या या कारवाईला येथील स्थानिकांनी कडाडून विरोध केला. कारवाई सुरू झाल्यानंतर मोठा जमाव याठिकाणी जमला आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं.
पोलिसांची एक टीम या कारवाईवेळी उपस्थित होती. पण जमावानं कारवाईला विरोध करत अचानक दगडफेकीला सुरुवात केली. यात काही पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी आता तणावाचं वातावरण आहे.