चिपळूण (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने चिपळूण नगर परिषदेतर्फे शंकरवाडी नवीन वसाहत येथील नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत फुलांच्या बागेत वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवीण शिवथरकर गुरुजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
सर्वत्र होणारी वृक्षतोड त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून दरवर्षी उष्णता मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासन स्तरावरून केल्या जात आहेत. त्यामुळे दरवर्षी नगर परिषदेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून झाडे लावली जातात. यावर्षी हजारो झाडे लावण्याचा संकल्प मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केला असून तशा सूचना त्यांनी उद्यान विभागाला दिले आहेत. यानुसार पर्यावरण दिनानिमित्ताने शंकरवाडी येथील नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत फुलांच्या बागेत वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. चिपळूण परिषदेतर्फे शहरातील विविध भागात हजारो वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी वृक्ष देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, रचना सहाय्यक नम्रता खैरमोडे, आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, माजी नगरसेविका सौ. आदिती देशपांडे, सौ. शिवानी पवार, ग्रामस्थ नारायण कदम, अमित कदम, विक्रमसिंग चौव्हाण, रविंद्र पत्याने, अरविंद जोगळे, मनीषा जोगळे, महेश कांबळी, सौ. साधना कात्रे, तृप्ती कदम आदी उपस्थित होते.
चिपळूण नगर परिषदेतर्फे पर्यावरण दिनी वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ
