नाणीज प्रतिनिधी:-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर छोटा टेम्पो कापडगाव (ता. रत्नागिरी) येथील काजवी नदीच्या पुलावरून २० फूट खाली कोसळून त्यात बसलेले तिघे जखमी झाले. या अपघातात टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापडगाव गावच्या हद्दीत आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान टेम्पो चालक ज्योतिबा सखाराम पेजे, ४८ रा. कापडगाव, हा आपल्या ताब्यातील टाटा टेम्पो क्रमांक एमएव्ह ०८-एपी ५६३३ घेऊन पाली ते कापडगाव असा चालला होता तो कापडगाव येथील काजवीपूल येथे आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन चौपदरीकरणासाठी चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे २० फूट खोल पडून हा अपघात झालेला आहे.
हा अपघात आज दुपारी बारा वाजता झाला.या अपघातामध्ये टेम्पोमध्ये बसून प्रवास करणारे विवेक महादेव पेजे ५०, उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झालेली आहे. इशा रामचंद्र पेजे ३२,कविता किशोर नागले ४५ सर्व रा. कापडगाव या दोघींना किरकोळ दुखापत झालेली आहे. सर्व जखमी कापडगाव येथील आहेत. जखमींना उपचारार्थ जगद्गुरू नरेंद्रमहाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून पाली ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.