गुजरातमधील दोन संशयितांवर गुन्हा
रत्नागिरी:-मुरा जातीच्या 6 म्हशी विक्री करण्याच्या बहाण्याने रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील एका तरुणाची तब्बल 2 लाख 63 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुजरातमधील दोन संशयितांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूकीची ही घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.41 वा. ते 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.20 वा. या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी अनिस आदमभाई घांची उर्प आबु, अमितभाई आदमभाई घांची (दोन्ही रा.थराद, गुजरात) अशा दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात जगदिश कृष्णा झोरे (29, रा.वेतोशी धनगरवाडी, रत्नागिरी) यांनी रविवार 2 जून रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जगदिश झोरे हे दुग्ध व्यावसायिक आहेत. ते वेतोशी येथे म्हशी पाळून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना मुरा जातीच्या म्हशींची दुग्ध व्यवसायासाठी गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा मित्र आशिष माने याने मुरा जातीच्या म्हशी खरेदी केल्या असल्याने त्याच्याकडे चौकशी केली होती. त्यानंतर या दोघांनी मोबाईलवरुन दोन्ही संशयित आरोपींशी मोबाईलवर संपर्प केला. त्यांना आपल्याला मुरा जातीच्या सहा म्हशी पाहिजे असल्याचे कळवले होते.
त्यानुसार संशयितांनी त्यांना व्हॉटऍपवर म्हशींचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी झोरे यांनी संशयितांना फोन पेव्दारे प्रथम 98 हजार रुपये आणि त्यानंतर बँक खात्यात 1 लाख 65 हजार रुपये असे एकूण 2 लाख 63 हजार रुपये पाठवले. त्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादी झोरे यांना दोन दिवसात म्हशी पाठवतो असे सांगितले. परंतू दोन दिवसांनंतरही म्हशी आल्या नाहीत. तसेच आरोपींनी फिर्यादी झोरेंशी संपर्कही बंद करत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी तीन महिन्यांनी फिर्यादीने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून संशयितांविरोधात भा.द.वि कायदा कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.