रत्नागिरी:-रत्नागिरी‚सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. १ हजार १५८ कर्मचार्यांची त्यासाठी नियुक्ती केली असून सकाळी ७ वाजता स्ट्रांगरुमचा दरवाजा उघडला जाणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टलची मतमोजणी सुरू होईल. पहिला राऊंड साडे दहा वाजेपर्यंत संपेल तर मतदान प्रक्रिया पुर्ण व्हायला दुपारी अडीच वाजतील, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.तर मतमोजी झाल्यानंतर त्याच दिवशी विजयी मिरवणूका काढण्यासाठी राज्यभरात परवानगी न देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरीतही परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या सह अन्य अधिकारी उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले, रत्नागिरी‚सिंधूदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी, मिरजोळे योथील गोदामात होणार आहे.
मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक यांची सरमिसळ करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ६ वाजता टपाली मतपत्रिकांची वाहतूक जिल्हा कोषागार कार्यालयातून मतमोजणी ठिकाणी करण्यात येणार आहे.त्यानंतर मतमोजणी उमेदवार व त्यांचा प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. सर्व प्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा संघनिहाय एकूण १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे.
चिपळूण विधानसभेमध्ये एकूण ३३६ मतदान केंद्रामध्ये २४ फेर्या, रत्नागिरी विधान सभेमध्ये एकूण ३४७ मतदान केंद्रामध्ये २५ फेर्या, राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्रामध्ये २५ फेर्या, कुडाळमध्ये २७८ मतदान केंद्रावर २० फेर्या, तर सावंतवाडी ३०८ निवडणुक केंद्रामध्ये २२ फेर्या होणार आहेत. मतमोजणासाठी १ हजार १५८ इतक्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी प्रक्रिये दरम्यान निवडणूक उमेदवाराच्या ९९ प्रतिनिधी उपस्थित असतील. एका फेरी साधारण ६० हजाराच्या वर मतांची मोजणी होणार आहे.
रत्नागिरी‚सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.०४ टक्के मतदान झाले होते. एकूण ९ लाख ७६ हजार ६१८ जणांनी मतदानाचा अधिकार नोंदवला होता त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.निवणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून भुवनेश प्रतापसिंह तसेच आर रेवती यांची नियुक्ती केली आहे. महायुती, महाविकसा आघाडी आदी पक्षांसाठी मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर स्वतंत्र व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये सामिल असलेल्या सुमारे साडेतेरा हजार कर्मचार्यांपैकी साडे तीन हजार कर्मचार्यांनी मतदान केले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली.