देवरुख:-देवरुखचा सुपुत्र तसेच रांगोळी कलाकार विलास रहाटे याचा कलेतील कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
मुंबई विद्यापीठात लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र आणि समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभ आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमस्थळी देवरूखचा प्रसिध्द रांगोळी कलाकार विलास रहाटे याने अहिल्यादेवी होळकर यांची हुबेहुब रांगोळी साकारली होती.
दरम्यान विलास याने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धा, कार्यक्रमांमध्ये हुबेहुब रांगोळी साकारत नावलौकीक मिळवला आहे. रांगोळी कलेसाठी आज विलास याचे नाव आदराने घेतले जाते.
विलास याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज रांगोळीने रेकॉर्ड ब्रेक करत गिनीज बुकात नोंद झाली आहे. रांगोळी कलेच्या माध्यमातून त्याने देवरूखबरोबर मुंबई विद्यापीठाचे नाव रोशन केले आहे. रांगोळी कलेतील कामगिरीची दखल थेट राज्यपाल रमेश बैस यांनी घेत विलास याचा सन्मान करत पाठीवर कौतुकाची थाप मारली. यावेळी राज्यपाल बैस यांच्यासमवेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍड रिसर्च मुंबईचे प्रा. डॉ. सतीश मोढ , समरसता साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष धीरज बोरीकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. बळीराम गायकवाड उपस्थित होते.